पावस : लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांच्या संशोधनाला यश आले असून, फक्त पाणी आणि सेंद्रिय खताचा वापर करीत नव्याने विकसित केलेल्या दोन वर्षांच्या काजूच्या कलमाला फळधारणा झाली आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगाला गती मिळाली असून चौथ्या किंवा पाचव्या वर्षी शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल, असा दावा शेतकरी अमर खामकर यांनी केला आहे. अमर खामकर यांची वाटचाल तरुणांना प्रेरणादायी आहे. मुंबईतील लालबाग सारख्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या भागात त्यांचा जन्म आणि शिक्षण झाले.
निव्वळ शेतीची आवड असल्यामुळे मुंबईतील आयात निर्यात क्षेत्रातील उच्च पगाराची नोकरी सोडून ते गावी परतले. १९९८ मध्ये काजू पिकाची पहिली लागवड करून त्यांचा कृषी क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी केले, प्रामुख्याने काजू बागेतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मॉडेल विकसित केले आहे. विशेष म्हणजे मजुरीवरील खर्च ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी काजूपासून बोंड वेगळं करायच्या मशीनचा उपयोग महत्त्वाचा आहे. तसेच वातावरणाचा लहरीपणा, मनुष्याला घातक अशा रासायनिक खतांचा वापर आणि त्यांच्या वाढत्या किमती तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च आणि त्यांचे दुष्परिणाम या बाबींचा विचार करून खामकर यांनी उत्तम प्रतिकारशक्ती असणारी काजूची स्वीन जात विकसित करण्याचा निर्धार केला. आठ वर्षांनंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. अति उष्णता, पाऊस याला ही बात तोंड देऊ शकते.
औषध फवारणीची आवश्यकता नाही. तसेच उत्तम पोषणमूल्य आणि उत्तम चव या बाबी लक्षात घेता या सेंद्रिय काजूगराला जगाच्या कोणत्याही बाजारपेठेत चांगला दर मिळवू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
काजू पिकातील सध्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भविष्यकाळात नव्याने विकसित केलेल्या या काजूच्या जातीची मागणी वाढेल यात शंका नाही. नव्याने तयार केलेल्या काजूच्या जातीता नाव दिलेले नाही. येत्या काही दिवसांमध्ये योग्य नाव ठेवून ती शेतकऱ्यांसमोर आणणार आहे – अमर खामकर, शेतकरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 14/Mar/2025














