रत्नागिरी : उत्कर्ष म्हणजे फक्त रस्ते बनवणे नव्हे. सागर वाचवण्यासाठी सागरी परिसंस्था टिकवली पाहिजे. रासायनिक खतांमुळे सागरावरही परिणाम होत आहे. या सर्वांचा विचार करताना तिथले प्राणी जगले पाहिजे. कोकणातील नद्या, खाड्या आणि समुद्रकिनारा हे कोकणचे मोठे शक्तीस्थान आहे. समुद्रावर जाताना कचरा करू नये, नदीत प्लास्टिक टाकू नये अशा अनेक गोष्टी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सांगाव्यात म्हणजे ते या गोष्टी त्या पर्यटकांनाही सांगितल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशन व पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटतर्फे (शाश्वत विकास अभ्यास केंद्र) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित प्रिन्सिपल कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. गुरूदास नूलकर, आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. जेएनपीटीच्या माध्यमातून पालघरमध्ये विद्यापिठाचे विस्तार केंद्र चालू करण्यात येणार आहे. लोक तिथे मत्स्यालय बघायला येतील आणि सागरी परिसंस्थेचा ऱ्हास कसा होत आहे हे पाहतील. समुद्रस्वच्छता व समुद्राचे पुनरूत्थापन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. लोक आज लक्झरी लाईफकडे वळले आहे. यात निसर्गाची वाट लागत असून, पुढच्या पिढीला या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत. शेतीमध्ये पैसे सर्वोच्च आहेत, असे सांगितले गेले. शेतीतून पशुप्राणीही गेले आणि समाधान मिळत नाही. पूर्वी शेतीत खूप समाधान मिळायचे, असे कुलगुरूंनी सांगितले.
नंदकुमार पटवर्धन यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि प्रतिनिधींना सांगितले की, सागर महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी ११ महिने उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यानुसार चांगले काम करणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार दिला जाईल, विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रही देणार आहोत.
नदी, समुद्रावर आपले अस्तित्व
पृथ्वीवर गोडं पाणी नाही. सर्व पाणी खारं आहे; परंतु पृथ्वीकडे गोड पाणी तयार करण्याची यंत्रणा आहे. पाऊस, बर्फ, दव या सर्वांची यंत्रणा आहे. निसर्गात कार्बन पंप सुरू आहे. ३० ते ३५ टक्के कार्बनची समुद्रात विल्हेवाट लावली जाते. ही व्यवस्था करोडो वर्षे सुरू आहे. समुद्राला महत्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व नदींना दिले पाहिजे. शहरी लोकांचे माती व पाण्याशी नाते तुटले आहे. समुद्र, नद्यांच्या खांद्यांवर आपले अस्तित्व अवलंबून आहे. अर्थव्यवस्था समुद्र, हायड्रो सायकल शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे समुद्राचे महत्व आपण दुर्लक्षित करू शकत नाही, असे गुरूदास नूलकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 05-10-2024