रत्नागिरी : धावत्या रेल्वेत जागा पकडण्यासाठी जाणार्या तरुणाचा पाय घसरुन रेल्वे खाली गेल्याने गंभीर जखमी होउन मृत्यू झाला. ही घटना शनिवार 15 मार्च रोजी सकाळी 8 वा. रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. 2 वर घडली.
रुपेश एकनाथ गुरव (42,रा.गुरववाडी राजापूर) असे गंभिर जखमी होउन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यातील खबर देणार यांचा पूतण्या सुजय गुरव व वाडीत राहणारा रुपेश गुरव हे दोघे मिळून शनिवारी सकाळी मुंबईला निघाले होते. ते दोघेही सकाळी 8 वा. रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर गेले होते. त्यावेळी मुंबई येथे जाणारी कोचिवली इंदौर एक्सप्रेस ही गाडी गोवाकडून येउन रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं 2 वर थांबत होती. तेव्हा जागा अडकवण्यासाठी रुपेश त्या धावत्या रेल्वेत चढत असताना त्याचा पाय घसरुन तो रेल्वेखाली गेला. त्याच्या उजव्या बाजुच्या मांडीवरुन रेल्वेचे चाक गेले. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी सकाळी 9.50 वा. रुपेशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 17-03-2025














