गुहागरात भूमिगत वीजवाहिनींच्या कामामुळे साईडपट्ट्यांसह रस्त्याचे नुकसान

गुहागर : गुहागर तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईडपट्टांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून कामानंतर रस्ते सुस्थितीत ठेवण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे निवेदन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी महावितरण चिपळूणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिले आहे.

या निवेदनानुसार, गुहागर तालुक्यातील समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गटारात टाकलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यांमुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते, केवल दुर्घटनेमध्ये सतीश घाणेकर या तरुणाचा काही वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. महावितरण अधिकाऱ्यांच्या समोरच चुकीच्या पद्धतीने काम होत असताना हे अधिकारी व त्यांचे कर्मचारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रस्त्याच्या बाजूला खोदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षतेचे कोणतेही मार्गदर्शक तत्वे पाळली जात नाहीत. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, रस्त्याच्या दरवस्थेबाबत ठेकेदाराला नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात लाईनचे काम निघाल्यास गटाराचे नुकसान होऊ शकते तथा गटाराचे काम करताना अपघात घडू शकतो त्याला नेमके जबाबदार कोण असणार असेही प्रश्न विनोद जानवळकर यांनी विचारला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 17/Mar/2025