Gogate Joglekar College Convocation: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीदान सोहळा उत्साहात; ८६ टक्के निकालासह गुणवंतांचा गौरव

ज्ञानाचा वापर समाजासाठी जबाबदारीने करा; डॉ. विवेक बेल्हेकर यांचे विद्यार्थ्यांना प्रतिपादन

रत्नागिरी:

रत्नागिरीतील प्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी Gogate Joglekar College Convocation कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. पदवीदान सोहळा हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड असून, मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी समर्थपणे व जबाबदारीने करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ८६ टक्के निकाल

नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंतर्गत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेचा महाविद्यालयाचा एकूण निकाल ८६ टक्के लागल्याची माहिती शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी दिली. या सोहळ्यात १६ पदव्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रामधून पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. अश्विनी देवस्थळी यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. याशिवाय अन्य ९ गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कृत्रिम बुद्धिमत्ता अन् बदलत्या जगाचे आव्हान

आपल्या मार्गदर्शनात डॉ. बेल्हेकर पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हवामान बदल आणि जागतिकीकरण यामुळे समाजाचा संपूर्ण आयाम वेगाने बदलत आहे. या बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ साक्षीदार न राहता त्या बदलांचा एक सकारात्मक संदर्भ बनले पाहिजे. ईशोपनिषदातील वचनाचा संदर्भ देत, ज्ञानातून सत्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवण्याचे काम शिक्षणामधून झाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

शिक्षणातून माणुसकी जोपासण्याचे आवाहन

कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षीय भाषणात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला. शिक्षणातून माणुसकीची जोपासना झाली पाहिजे, असे सांगत त्या म्हणाल्या की, प्रामाणिक कष्टांनी यश मिळवून इतरांचे जगणे सुकर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. तसेच, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पदवीधरांनी एक जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे आणि कुटुंब व शिक्षकांप्रती कृतज्ञ राहण्याचे आवाहन केले. नियामक मंडळ सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:50 10-07-2026