राजापुरातील राष्ट्रीय सेवा समितीच्या नव्या इमारतीचे उद्या लोकार्पण

राजापूर : गेल्या सुमारे पन्नास वर्षांतील संघ कार्याची साक्षीदार असलेल्या व शहरातील मध्यवर्ती भागातील राष्ट्रीय सेवा समितीची वास्तू असलेल्या इमारतीचा नूतनीकरण समारंभ रविवारी ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी विभागाचे संघचालक दत्ताराम गंगाराम सोलकर यांच्या हस्ते या नूतनीकरण सोहोळ्यात भारतमाता पूजन व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यांच्या संघनिष्ठा आणि दातृत्वातून या वास्तूसाठी हक्काची जागा मिळाली त्या दिवंगत ज्येष्ठ स्वयंसेवक तथा राजापूर हायस्कूमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या वास्तूचे नामकरण गुरूवर्य वासुकाका जोशी भवन असे करण्यात येणार आहे.

राजापुरातील संघ कार्यालयाची वास्तू नूतनीकरण आणि सुशोभिकरणानंतर नव्याने दिमाखात उभी राहिली आहे. संघाच्या शताब्दी वर्षात या वास्तूचे अद्ययावत स्वरूपात साकार होणे ही सुवर्णभेटच असल्याचा आनंद राजापूर तालुका संघचालक राजेंद्र कुशे यांनी व्यक्त केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील राष्ट्रीय सेवा समितीची ही वास्तू हजारोंच्या परिचयाची आहे. ही वास्तु, आतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, मागील बाजुचे विस्तीर्ण पटांगण हे गेल्या अनेक दशकांतील संघ कार्याच्या चढ-उताराचे साक्षीदार आहे. असंख्य कार्यक्रम या वास्तूत झालेले आहेत. अनेक विद्यार्थी, स्वयंसेवक, विद्यार्जनासाठी तसेच संघाचे अनेक अधिकारी, प्रचारक याठिकाणी राहिलेले आहेत. कालपरत्वे ही वास्तू जीर्ण झाल्याने सर्वाच्या मदतीने तीचे नूतनीकरण करण्यात आल्याचे श्री. कुशे यांनी सांगीतले.

दरम्यान ६ ऑक्टोबर रोजीच्या र्काक्रमात सकाळी आठ ते दहा या वेळेत श्रीगणेशपूजन, दुपारी अकरा ते साडेबारा या कालावधीत मान्यवरांचे मार्गदर्शन, त्यानंतर एक वाजता भोजन, सायंकाळी साडेचार वाजता भारतमाता पूजन त्यानंतर पाच ते साडेसहा या कालावधीत उपस्थित नागरिक तसेच हिंदु बंधू भगिनींसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन व अल्पोपहारानंतर कार्यक्र माची सांगता होणार आहे. सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला हिंदु बांधवांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी अध्यक्ष संतोष पावरी व राजापूर तालुका संघ चालक राजेंद्र कुशे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:46 PM 05/Oct/2024