चिपळूण : अनारी ग्रामदेवतेचा नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात सुरु

चिपळूण : तालुक्यातील अनारी येथील अनारी ग्रामदेवतेच्या नवरात्रौसवा पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापनेने विधिवत या उत्सवाला सुरुवात झाली असून रात्रौ मंगलमय वातावरणात स्थानिक ग्रामस्थांनी हरिपाठ, महाआरती आणि संगीतमय भजनाच्या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाचा अत्यंत थाटात या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

अनारी गावातील हनुमान वाडीतील नवतरुण मित्र मंडळ आणि हनुमान समाजसेवा मंडळाच्या कार्यार्त्यानी रात्रभर संगीतमय भजनासारखा कार्यक्रम सादर करून या उत्सवाची पहिल्या दिवसाची रंगत वाढविली. काल संपूर्ण दिवसभर पंचक्रोशीतील ग्रामदेवतेच्या भक्तांनी आणि विशेषतः महिलांनी ग्रामदेवता नवरात्र उत्सवाला भेटी दिल्या. या निमित्ताने अनारी गावातील स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने ग्रामस्थांतर्फे ग्रामदेवता मंदिर परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर सजविण्यात आला आहे. या निमित्ताने दर दिवशी उत्सव काळात मंदिरामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गावातील हनुमानवाडी, शिबेवाडी, गणेशवाडी, वरदानवाडी, विठ्ठलवाडी, तांबडवाडी ई. वाड्यातर्फे रात्रौ हरिपाठ भजन, संगीत, हरीजागर, जाखडी नृत्य, दांडिया रास ई. स्वरूपांच्या मनोरंजन आणि धार्मिक स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केदारनाथ ग्रामसुधार समिती, अनारी आणि केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुबई, पुणे- अनारी) आणि ग्रामस्थांच्या संयुक्त आयोजित केलेल्या या उत्सवाला दर वर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आला असून निसर्गरम्य परिसरात वसलेल्या हे ग्रामदेवतेच्या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी (पाषाणी) स्वरुपात असून दगडीवर कोरलेले नक्षीकाम हे भाविकांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ग्रामदेवतेचा उल्लेख केला जातो. तरी या महोत्सवाला भाविकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केदारनाथ ग्राम सुधार समिती अनारी, आणि केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई-पुणे-अनारी) आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 05/Oct/2024