खेड : दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट तालुक्यांतील ६४ गावे १२९ वाड्यांची टंचाई आराखड्यात नोंद झाली आहे. तालुक्यातील चिरणी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे धावही घेतली आहे.
टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया तोंडावर असतानाही येथील पंचायत समितीचा एकमेव शासकीय टँकर आवारातच धूळखात पडला आहे. टँकरची देखभाल-दुरुस्ती करण्याची तसदी अद्याप घेण्यात आलेली नाही. गत महिन्यात आयोजित पाणीटंचाई आराखडा बैठकीदरम्यान १७ गावे ४४ वाड्या टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या होत्या. गुहागर विधानसभा मतदार संघातील टंचाईग्रस्त गाववाड्यांची टंचाई आराखड्यात नोंद केली आहे. सर्वाधिक गाव-वाड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही मतदारसंघांतील ६४ गावे १२९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे एकच शासकीय टँकर उपलब्ध आहे; मात्र तो सद्यःस्थितीत पंचायत समिती आवारात उभा आहे. पाण्याचा शासकीय व टँकर सुस्थितीत ठेवण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे. त्यातच चिरणी-धनगरवाडीतील जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे. टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्जही दाखल केला. मात्र, आठवडा उलटूनही ग्रामस्थ अद्यापही टँकरच्या प्रतीक्षेतच आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 18/Mar/2025














