चिपळूण : शहरातील उड्डाणपुलाचे काम करताना रस्त्यावर लटकणारी जाळी मार्गावरून जाणाऱ्या ट्रकला अडकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेवेळी पुलावर तीन ते चार कर्मचारी काम करत होते. ट्रकचालकाने प्रसंगाधान राखून वेळीच ट्रक थांबवल्याने मोठा अपघात टळला आहे.
शहरातील बहादूरशेखनाका येथे १६ ऑक्टोबर २०२३ रोजी उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात अनेकजण बालंबाल बचावले होते. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन्ही बाजूस संरक्षक बाबी उभ्या करून काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही योग्य खबरदारी घेण्यात आलेली नसल्याचे मंगळवारी समोर आले.
उड्डाणपुलाचे काम करताना लावलेली जाळी एका ट्रकला अडकल्याचा प्रकार घडला. ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ट्रक थांबल्यानंतर अडकलेली जाळी काढल्यानंतर ट्रकचालक मार्गस्थ झाला. मात्र, आधीपासूनच वादग्रस्त झालेल्या या कामात अजूनही हलगर्जीपणा सुरूच असल्याचे पुढे येताच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 19/Mar/2025













