रत्नागिरी : पावसाचा चार महिन्यांचा हंगाम आटपला असून, यंदा पावसाने समाधानकारक सातत्य ठेवत जिल्ह्यात ४ हजार २०० मि.मी. ची विक्रमी सरासरी गाठली. सरासरीच्या २४ टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. यामुळे पाणी टंचाईची झळ कमी बसणार असली, तरी गेल्या चार महिन्यांत पावसामुळे २९ कोटींचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाचवेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत सुमारे साडेतीनशे लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करावे लागले होते. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनीही अनेकदा इशारा पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांवर पुराची टांगती तलवार होती. यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते.
चार महिन्यांच्या पाऊस हंगामात अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात घरे, गोठे, जनावरे, दुकाने यांच्यासह विविध सार्वजनिक मालमत्तांचे मिळून एकूण २९ कोटी ४३ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर यंदाच्या हंगामात पाऊसबळींची संख्या पाचवर होती. अनेक भागांत अतिजोरदार पावसाने भात शेतीही पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका जिल्ह्यातील सुमारे २२०४ शेतकऱ्यांच्या १२७ हेक्टर क्षेत्रांतील खरोप लागवडीला बसला. या कालावधीत शासकीय मालमत्तांचे सुमारे १२ कोटी ५६ लाखांची हानी झाली आहे. यामध्ये ६२ शाळा आणि १७ अंगणवाड्यांचा समावेश आहे. वैयक्तिक मालमत्तांमध्ये घर, गोठे, आणि पडवी आदींची १६ कोटी ३४ लाख ५६ हजारांची हानी झाली आहे. यामध्ये ९७७ घरांचा, १४२ गोठ्यांचा आणि ५३८ दुकानांचा समावेश आहे.
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय निकषान्वये ३३६४ मि.मी. सरासरी पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाने तीन महिन्यांतच ही सरासरी गाठताना अखेरच्या महिन्यात ४२०० मि.मी. ची मजल गाठली. या कालावधीत सर्वच तालुक्यांत पावसाने शतकी मजल गाठली होती. यावर्षी सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात (४५६८ मि.मी.) झाला. तर कमी पावसाचे प्रमाण गुहागर तालुक्यात (३४६५ मि.मी.) आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 05/Oct/2024