रत्नागिरी, दि. २० मार्च २०२५: रत्नागिरी आणि परिसरातील निसर्गप्रेमी तसेच महाराष्ट्रातील निसर्गतज्ञांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या स्काय अॅण्ड अर्थ निसर्ग चळवळी अंतर्गत गेल्या चार वर्षांपासून निसर्गप्रेमींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या चळवळीतर्फे तज्ञांची दृकश्राव्य व्याख्याने आणि निसर्गसहलींसारखे कार्यक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या रविवारी, दि. २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता जागतिक वन दिन आणि जागतिक हवामान दिनानिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम स्काय अॅण्ड अर्थ आणि श्रीम. विमलाताई पटवर्धन शहर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असून, यामध्ये दोन नामवंत तज्ञ व्यक्तींची दृकश्राव्य व्याख्याने होणार आहेत. प्रा. श्री. शरद आपटे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, वनस्पतीशास्त्र विभाग) आणि श्री. मिलिंद पाटील (वन पुनर्संचयन आणि वनपरिसंस्था पुनरुज्जिवन चळवळीचे प्रणेते, सिंधुदुर्ग) हे तज्ञ आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे ठिकाण आहे – श्रीम. विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय, मारुती मंदिर, छ. शिवाजी महाराज स्टेडिअमच्या मागील बाजूस, स्वामी विवेकानंद पथ, रत्नागिरी.या कार्यक्रमाद्वारे निसर्ग संवर्धन आणि हवामान बदलाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्याचा मानस आहे. आयोजकांनी सर्व निसर्गप्रेमींना या कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.













