रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथे एका 68 वर्षीय प्रौढाचा मृतदेह त्यांच्या घरामागील सुरुबनात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी, 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्ती दारूच्या व्यसनाधीन असल्याचे समजते असून, पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मृत प्रौढाचे नाव अनिल बेंडू मयेकर (वय 68, रा. काळबादेवी मयेकरवाडी, रत्नागिरी) असे आहे. अनिल मयेकर हे लॉन्चवर मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते घरी परतले नव्हते, त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मयेकर यांचा शोध घेत असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेल्या सुरुबनात ते उताणे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 21/Mar/2025














