पाचल : ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच जामदा प्रकल्पाचे काम केले जाईल, सुयोग्य पुनर्वसन, योग्य मोबदला या संदर्भात येत्या १ मे पूर्वी आपल्यासमोर व आपल्याला विश्वासात घेऊन निवाडा जाहीर केला जाईल. प्रकल्पातील शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करू, गेले अनेक वर्षे रखडलेले प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी आपापसांतील मतभेद व गैरसमज दूर करून प्रकल्पाला सहकार्य करावे, प्रशासनाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तसेच अधिकाऱ्यांची मनमानीही खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी बोलताना केले.
गेली अनेक वर्षे रखडलेले प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रकल्पग्रस्त, मुबंईकर प्रामस्थ व प्रशासनाचे अधिकारी यांची सयुक्त सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता जाधव, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष दिपक नागले, सरपंच अंकुश बारगोडे व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी वा सभेला उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्थांच्या व्यथा माडतांना चंद्रकात पवार यांनी अधिकारी दलालाना हाताशी धरून व ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करत आहेत. जोपर्यंत या प्रकल्पात दलालांचा हस्तक्षेप थांबत नाही, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम आम्ही करू देणार नाही. प्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल; मात्र प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका चंद्रकांत पवार यांनी मांडली.
मुंबइतील सामाजिक कार्यकर्ते विजय घाग यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा, नियम निकष धाब्यावर बसवून अधिकारी काम करत आहेत. मूर सांडव्याला ग्रामस्थांचा विरोध असूनही अधिकारी जबरदस्तीने पुनर्वसन ग्रामस्थांवर लादत आहेत, भविष्यात माळीण गावासारखी दुर्घटना येथे घडल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विजय घाग यांनी उपस्थित केला. कोकण आयुक्तांनी देखील भूवैज्ञानिकांचा अहवाल आल्याशिवाय काम करू नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असतानाही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे घाग यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आ. किरण सामंत यांनी जे अधिकारी दलालांना हाताशी धरून काम करीत असतील, त्यांच्यावर कठोर करवाई करून दलालांची साखळी मोडून काढण्याचा स्पष्ट इशारा दिला. मूर सांडव्याबाबत आपल्याशी बोलूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. काजिर्दा गावात मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नवीन घरे बांधण्यात आली आहेत. याचाबत आमदार सामंत म्हणाले की, २०२३ पूर्वीच्या घरांचे मूल्यांकन करण्यात येईल. २०२३ नंतरच्या कोणत्याही घराचे मूल्यांकन होणार नसल्याचे शासनाची स्पष्ट भूमिका किरण सामंत यांनी मांडली. यावेळी गात्रिमुख नारायण आर्डे, चंद्रकांत पवार, विजय घाग यांनी मनोगत व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 24/Mar/2025














