Dr Kanchan Madar Chiplun: लाचखोर महिला डॉक्टर कांचन मदार यांच्या अडचणीत वाढ; गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची शिफारस

कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० पासून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाच नव्हता; धक्कादायक खुलाशाने पुरवठादार रडारवर

चिपळूण/रत्नागिरी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील (Kamthe District Sub Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार आता अधिकच कायदेशीर अडचणीत आल्या आहेत. लाचखोरीच्या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी पूर्ण झाली असून, जिल्हा रुग्णालयाने डॉ. मदार यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यान्वये (MTP Act) गुन्हा दाखल करण्याची शिफारस चिपळूण पोलिसांकडे केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या विशेष चौकशी अहवालात डॉ. मदार यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

४,५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने आवळल्या होत्या आवळल्या मुसक्या

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. गेल्या ३ जून रोजी कामथे रुग्णालयात एका गरोदर महिलेकडे गर्भपाताचे किट (Abortion Kit) देण्यासाठी डॉ. कांचन मदार यांनी ४,५०० रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना रंगेहाथ पकडले होते. या हायप्रोफाईल कारवाईनंतर जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती नेमली होती. या समितीच्या सखोल तपासात वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

२०२० पासून गोळ्यांचा साठाच नव्हता; मग किट आले कुठून?

चौकशी समितीने कामथे रुग्णालयाचे शासकीय रेकॉर्ड तपासले असता असे आढळून आले की, या उपजिल्हा रुग्णालयात २०२० सालापासून गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या गोळ्यांचा कोणताही अधिकृत शासकीय साठा उपलब्ध नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयाने गेल्या ६ वर्षांत मुख्य जिल्हा रुग्णालयाकडे अशा प्रकारच्या औषधांची किंवा गोळ्यांची कोणतीही अधिकृत मागणी (Indent) नोंदवली नव्हती.

एसीबीने कारवाई दरम्यान जप्त केलेल्या गोळ्यांची रासायनिक व वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञांमार्फत करण्यात आली. या तपासणीत जप्त केलेल्या गोळ्या या बेकायदेशीर आणि अनधिकृत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्याच असल्याचा शिक्कामोर्तब तज्ज्ञांनी केला आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता; बेकायदेशीर पुरवठादाराचा शोध सुरू

शासकीय रुग्णालयात अधिकृत साठा नसताना आणि कोणतीही मागणी नोंदवली नसताना डॉ. कांचन मदार यांच्याकडे हे हाय-रिस्क गर्भपाताचे किट आले कुठून? त्यांना खाजगी बाजारातून किंवा इतर कुठून या गोळ्यांचा पुरवठा केला जात होता का? या गंभीर प्रश्नांमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. यामागे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एखाद्या मोठ्या रॅकेटचा हात आहे का, यादृष्टीने आता पोलिसांनी पावले उचलली आहेत. या प्रकरणात डॉ. मदार यांना औषधे पुरवणाऱ्या मुख्य पुरवठादाराचा (Supplier) शोध आता चिपळूण पोलिसांमार्फत घेतला जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयाने या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्याला अधिकृत पत्र पाठवून डॉ. कांचन मदार यांच्यावर ‘वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार’ (Medical Termination of Pregnancy Act) गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या नव्या वळणामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 26-06-2026