गुहागर : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गव्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.
यासाठी शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाबाबत कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याकरिता काही आराखडा तयार करून वनविभागामार्फत आराखड्याची अंमलबजावणी करावी व बागायतीला होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी नागपूर येथील वन्यजीव मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्रानुसार, गुहागर तालुक्यातील झोंबडी गावामध्ये गट नंबर १८४४, १८४६, १८४८ मध्ये आंबा व काजूची बाग आहे. या आंबा कलमांच्या बागेमध्ये गवा प्राणी शिरून आंब्याची कच्ची फळे खाणे, आंबा झाडाला घासून आंबे पाडून आंबा बागेचे नुकसान करत आहेत. या भागातील गव्यांच्या कळपाने सुपारी, काजू, आंबा या सर्व बागायती क्षेत्रांमध्ये येत असून, बागायती क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. या सर्व नुकसानीचे प्रमाण फार मोठे आहे.
बागायतीचे होणारे नुकसान आर्थिक मदतीने न भरून येणारे आहे. कारण, बागायत क्षेत्र निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला अनेक वर्षे कष्ट करावे लागतात. दिवसेंदिवस गवा प्राण्याचा त्रास गुहागर व चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढत आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 26/Mar/2025














