गणपतीपुळे येथे श्री गणेशास सिंदूर लेपन

गणपतीपुळे, दि. २६ मार्च २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मूर्तीला आज सिंदूर लेपन करण्यात आले. येणाऱ्या हिंदू नववर्षातील पहिल्या सण असलेल्या पाडव्याच्या निमित्ताने हा विधी पार पडला. गणपतीपुळे येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून, माघी गणपतीपासून विविध उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. या ठिकाणी नित्यनियमाने होणारी पूजा-अर्चना आणि सणांमुळे गणेश मूर्तीची झीज होण्याची शक्यता असते. ही झीज थांबवण्यासाठी मूर्तीला सिंदूर लेपन करण्याची परंपरा आहे.

जाणकारांच्या मते, सिंदूर लेपन हा मंदिरातील धार्मिक विधी नसून, केवळ मूर्तीच्या संरक्षणासाठी केला जाणारा उपाय आहे. एखाद्या मोठ्या उत्सवानंतर किंवा उत्सवापूर्वी हे लेपन केले जाते. यंदा पाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने आज या प्रक्रियेला प्रारंभ झाला. मूर्तीला सिंदूर लावण्यामुळे तिचे संरक्षण तर होतेच, शिवाय तिचे दृश्य स्वरूपही अधिक आकर्षक बनते, असे मंदिर व्यवस्थापनातील काहींनी सांगितले.

गणपतीपुळे हे कोकणातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असून, येथील स्वयंभू गणेश मूर्ती नैसर्गिकरीत्या भूमीतून उगम पावलेली आहे. या मूर्तीची झीज टाळण्यासाठी वेळोवेळी अशा संरक्षक उपाययोजना केल्या जातात. आज पार पडलेल्या सिंदूर लेपनामुळे मूर्ती नव्याने उजळून निघाली असून, पाडव्याच्या स्वागतासाठी मंदिर परिसर सज्ज झाला आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पाडव्याच्या दिवशी, दि. ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी बाहेर पडणार आहे. ही पालखी डोंगराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात परत येईल. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्थानिक भाविकांसह दूरदूरहून भक्तगण येण्याची शक्यता आहे. पाडव्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात विशेष पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधींचेही आयोजन करण्यात आले आहे.

Happy journey english

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 26/Mar/2025