खेड : तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचा ग्रामस्थांना दाह जास्त जाणवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आटलेले जलस्त्रोत अन् पाणीसाठ्यात झालेली घट यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी आतापासूनच पायपीट सुरू आहे. टंचाई आराखड्याच्या नोंदीनुसार ९ गावांमध्ये एप्रिल महिन्यात तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिवाणखवटी सातपानेवाडी येथील ३० लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांना टँकरचे पहिले पाणी दिले जाण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीने तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार यंदा १७ गावे ४४ वाड्यांचा टँकरच्या पाण्याच्या यादीत समावेश केला आहे. २२ मार्चपासून सुसेरी-देवसडे येथील कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी या ठिकाणी पाण्याचा टँकर धावण्याची शक्यता टंचाई आराखड्यानुसार नोंदवण्यात आली होती. येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीटही करावी लागत आहे; मात्र तरीही एकाही वाडीचा टँकरच्या पाण्यासाठी अद्याप अर्ज प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी ८ एप्रिलपासून तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर धावला होता. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच तालुक्यातील तहानलेल्या गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणी विभागाने सुसज्जता ठेवली आहे.
१५ एप्रिलपासून टँकर धावणार
फुरूस येथील गावठण, बौद्धवाडी, कातळवाडी, मोहल्ला, रेवाळेवाडी, पाटीलवाडी, सुतारवाडी, नवानगर, कांगणेवाडी, कुंभेवाडी, फळसोंडा आदी वाड्यांमध्ये १५ एप्रिलपासून पाण्याचा टँकर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाठोपाठ कुळवंडी-शिंदेवाडीतील ३०० ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. तळे-पालांडेवाडी, धनगरवाडी, तुळशी बुद्रुक, खुर्द, कुबजई-धनगरवाडी, चिंचवली-ढेबेवाडी, घेरारसाळगड येथील पेठवाडी, ताम्हणवाडी, बौद्धवाडी, ओझरवाडी, निमणी-धनगरवाडी, खवटी वरची व खालची धनगरवाडी येथील ग्रामस्थांनाही एप्रिल महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 28/Mar/2025
