रत्नागिरी : संचमान्यतेचा निकष बदलून शासनाने ६ ते ८ वीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पट असेल तर तिथे एक पदवीधर शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दोन पदवीधर शिक्षक असून त्यातील एक अतिरिक्त ठरणार आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे सहाशेहून अधिक पदवीधर शिक्षक अतिरिक्त होण्यीची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच शिक्षकांची पदे रिक्त असतानाच त्यात पदवीधर शिक्षकांची भर पडणार आहे.
संचमान्यतेचे निकष बदलून सरकारी शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी २० पटसंख्येच्या आतील वर्गांना पदवीधर शिक्षक देऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर शिक्षक संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याची मागणी केली होती. दोन शिक्षक नेमावेत अशी मागणी करण्यात आली होती. मंत्रालयांमध्ये बैठकांवर बैठकाही झाल्या होत्या. अखेर शासनाने परिपत्रक काढून एक पदवीधर शिक्षक २० पटाच्या शाळांमध्ये नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेक शिक्षक संघटना दोन शिक्षकांच्या मागणीवर ठाम आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात ६ ते ८ वीच्या शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांची संख्या अधिक असून अनेक शाळांवर दोन पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. नव्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली तर अनेक पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. त्यांची संख्या सहाशेवर जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे मोठ्यप्रमाणात रिक्त होणार आहेत. शासनाने समूह शाळांचा उपक्रम हाती घेतला आहे. पदवीधर शिक्षकांच्या संख्येत केलेली घट, हा त्याचाच भाग असल्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यासारख्या दुर्गम भागांवर होणार आहे.
दरम्यान, नवीन परिपत्रकामुळे जिल्हापरीषद प्राथमिक शिक्षण विभागाची नवीन शिक्षक भरतीची टप्पा २ मधील प्रक्रिया थांबलेली आहे. उपशिक्षकांची पदे किती भरायची यावर सर्वकाही अडून राहिलेले आहे. एकूण उपशिक्षकांच्या पदांची निश्चिती होईपर्यंत नवीन नियुक्त्या थांबणार आहेत.
जिल्ह्यात वीसपेक्षा कमी पट असलेल्या ६ ते ८ वीच्या शाळांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या शाळांवर सध्या नियुक्त असलेले पदवीधर शिक्षक संचमान्यतेच्या नव्या निकषामुळे अतिरिक्त ठरू शकतात. हा निर्णय गेल्यावर्षी झाला होता. त्याची अंमलबजावणी यंदा केली जात आहे. याबाबत मंत्रालयीनस्तरावर बैठकाही झाल्या. परंतु कमी पटाच्या शाळांवर पदवीधर शिक्षक देण्यास शासन सकारात्मक नाही. – दिलीप देवळेकर, शिक्षक नेते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 01-04-2025
