उशिरा तयार होणाऱ्या आंब्याचे उत्पादन धोक्यात

चिपळूण : दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मे आणि जून महिन्यात तयार होणारा आंबा अवकाळी पावसामुळे डागळण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सोमवारी रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. यामुळे उष्णतेमध्येही कमालीची वाढ झाली आहे.

कोकणातील काही तालुक्यांमध्ये हापूस आंबा तयार झाला आहे तो विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यात आला आहे; मात्र चिपळूण तालुक्यातील हापूस आंबा अजून तयार झालेला नाही. चिपळूण तालुका सह्याद्रीच्या कुशीत समुद्रापासून लांब असल्यामुळे येथील आंबा मे आणि जूनमध्ये तयार होतो. येथील बाजारपेठेत देवगडचा हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. रत्नागिरी, दापोली, गुहागर येथून काही विक्रेत्यांनी हापूस आंबा विक्रीसाठी आणला आहे. चिपळूणमधील बागायतदारांचा आंबा मे अखेर तयार होतो. तालुक्यात ६४ शेतकऱ्यांनी आंब्याचे उत्पादन घेतले आहे. या आंब्यावर अवकाळी पाऊस पडल्याने तो खराब होण्याचा जास्त धोका आहे. थंडीच्या हंगामात चांगला मोहोर आला होता; मात्र किडींचा प्रादुर्भाव आणि कडक उन्हामुळे मोहोर करपला. अवकाळी पावसामुळे स्थानिकांचा आंबा टिकाव लागण्याची शक्यता कमी आहे. मे महिन्यात आंब्याचे दर उतरतात. त्यामुळे स्थानिक बागायतदारांना चांगला दर मिळत नाही. मिळणाऱ्या पैशातून खर्चही बाहेर निघत नाही. त्यातच आता अवकाळी पावसामुळे आंबा खराब होण्याचा धोका अधिक आहे.

गतवर्षी मेपासून स्थानिक आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादन कमी होण्याचा धोका आहे. आम्हाला खर्चही काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. – संजय शिंदे, बागायतदार, पेढांबे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 05-04-2025