पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत

रत्नागिरी : दरवर्षी राज्यात द्वितीय सत्रांतील परीक्षा साधारणपणे १५ एप्रिलपूर्वीच पूर्ण व्हायच्या. मात्र, यावर्षी राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी राज्यभर एकच वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

यावर्षी विद्यार्थ्यांची उशिरापर्यंत परीक्षा सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांचे मामाच्या गावाला जाणेदेखील लांबणार आहे. कारण पुन्हा पाच दिवसांच्या कालावधीत निकाल जाहीर केले जातील. याचा प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांमार्फत व शाळा स्तरावरून मोठा विरोध होत आहे.

तरीही शासनाकडून अद्यापही वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र व थेट परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार ५ ते २५ एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे हे वेळापत्रक निश्चित धरून काही शाळांनी वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाठविले आहे.

२०२४- २५ च्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाईल. यंदा पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार आहे. त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याची ‘डायट’ किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते.

निकाल जाहीर करण्याचे शाळेसमोर आव्हान
परीक्षा होताच फक्त एका आठवड्यातच उत्तरपत्रिका तपासून मूल्यमापन फॉर्म करणे, संकलित निकाल करणे, प्रगतिपुस्तके भरणे, वर्णनात्मक नोंदी घालणे यासारखे अनेक सोपस्कार पार पाडून १ मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचे आव्हान शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 05/Apr/2025