मंडणगड आगार व्यवस्थापनाचे स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष ?

मंडणगड : मंडणगड शहरातील बसस्थानकाच्या आवारात असलेल्या शहरातील एकमेव स्वच्छतागृहाच्या गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या दूरवस्थाकडे स्थानिक आगार व्यवस्थापनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ड्रेनेज अभाव व स्वच्छतागृहातील दुर्गंधी दूर करण्यासाठी मंडणगड आगाराने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मंडणगड बसस्थानकाच्या आवारात शहरातील एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. जागेअभावी शहरात अन्यत्र दुसरे कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहांचा एका अर्थाने पूर्ण तालुक्याकडून वापर केला जातो, ही बाब लक्षात घेता येथे प्रशस्त व मोठी स्वच्छतागृहे असावीत व तो सुस्थितीत असावीत, अशी तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे.

या संदर्भात मंडणगड नगरपंचायतीसह अनेक स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. अनेकवेळा स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी निधीची घोषणाही झाली; पण हा विषय तांत्रिक व कायदेशीर बाबीमुळे पुढे सरकलेला नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने मंडणगड आगाराच्या माध्यमातून हे काम स्वतः हाती घ्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. राज्य परिवहन महामंडळ ही स्वतंत्र संस्था असल्याने या संस्थेस निधीसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, ही बाब स्थानिक आगार व्यवस्थापनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

खासदार सुनील तटकरे यांनीही परिवहन महामंडळाने या कामी पुढाकार घेण्याच्या सूचना देत तालुकावासीयांची गैरसोय दूर करण्याबद्दल सांगितले आहे. स्वच्छतागृहाच्या निर्मितीसाठी शासन, आमदार, खासदार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून मिळणाऱ्या निधीची वाट पाहत बसण्यापेक्षा आगार व्यवस्थापनाने स्वतः नवीन स्वच्छतागृह निर्माण करण्याची मागणी पुढे येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 02/Apr/2025