Ghibli image: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घिबली इमेजेसने धुमाकूळ घातला आहे. घिबली इमेज हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेले तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून चॅटजीपीटीवर तुम्हाला स्वत:च्या ॲनिमेटेड प्रतिमा तयार करता येतात.
आतापर्यंत कोट्यवधी युजर्सनी घिबली इमेजेसचा वापर करुन आपल्या प्रतिमा तयार केल्या आहेत. भारतासह जगभरातून याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ओपन एआयचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेले हे टूल बंद पडले होते. घिबली इमेज तयार करुन घेण्यासाठी एकाचवेळी लाखो युजर्स चॅटजीपीटीचा वापर करत असल्याने ओपन एआयच्या सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. त्यामुळे घिबली इमेज तयार करताना अनेक चुका होत असल्याचेही समोर आले आहे. ( Ghibli image )
यापैकी काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी एका फोटोत एका एका महिलेने तिचा नवरा आणि दोन लहान मुलींसह घिबलीवर फोटो अपलोड केला होता. मात्र, त्याची ॲनिमेटेड इमेज तयार होताना फोटोत नवऱ्याऐवजी दुसराच लहान मुलगा दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत एका जोडप्याने गुढीपाडव्याचा फोटो टाकला आहे. गुढीसह नवरा-बायकोचा फोटो अपलोड करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष घिबली इमेज तयार होताना त्याठिकाणी गुढीच्या ऐवजी एक पाठमोरी बाई दिसत आहे. या सगळ्यावर कळस म्हणजे एआय टुलला अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि साईबाबांमध्ये फरक ओळखता आलेला नाही. एका युजरने स्वामी समर्थांचा प्रकटदिनी त्यांच्या तसबिरीसोबत एक फोटो काढला होता. या फोटोची घिबली इमेज तयार करण्यासाठी युजरने हा फोटो चॅटजीपीटीवर अपलोड केला होता. मात्र, प्रत्यक्षात इमेज तयार होऊन आली तेव्हा डोक्यावर हात मारुन घेण्याची पाळी आली. कारण, या इमेजमध्ये स्वामी समर्थांऐवजी साईबाबा दिसत होते. ( Ghibli image )
चॅटजीपीटीवर घिबली इमेजच्या फ्री व्हर्जनवर सुरुवातीला कितीही फोटो तयार करता येत होते. मात्र, सर्व्हरवरील लोड वाढल्यामुळे चॅटजीपीटीने फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ तीन इमेज तयार करुन देण्याचे ठरवले आहे. या सगळ्यामुळे ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांना ट्विट करण्याची वेळ आली होती. त्यांनी युजर्सना घिबली इमेज तयार करण्यापासून ब्रेक घेण्याचे आवाहन केले होते. आमच्या टीमला झोपेची गरज आहे. इमेज जनरेटरमुळे सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. आमचे जीपीयू वितळत आहेत. आम्ही इमेज जनरेटवर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सॅम अल्टमन यांनी म्हटले होते. ( Ghibli image )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 02-04-2025
