सोलापूर : राज्यात काही ठिकाणी पती-पत्नीच्या वादातून पतीची हत्या केल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. तर, उत्तर प्रदेशातही एका महिलेनं (Women) आपल्या पतीचा खून करुन मृतदेह चक्क निळ्या ड्रममध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
या घटनांमुळे पुरुषांवरही अन्याय, अत्याचार होत असल्याची खंत काहींनी व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगाने आता राज्यात सध्या ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार समोर येऊ लागले आहेत, ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाचीही स्थापना करण्याची गरज वाटू लागल्याचे भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी म्हटले आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र, अलीकडे महिला ज्या पद्धतीने वागत आहेत, ते पाहता पुरुषांकडून होत असलेल्या पुरुष हक्क आयोगाचीही निर्मिती करण्याची वेळ आल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं.
नुसत्या समुपदेशनाने भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. राज्यात पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. महिलांच्या प्रश्नावर सातत्याने लढणाऱ्या तृप्ती देसाई अलीकडच्या काळात महिलांकडून होत असलेल्या हत्येमुळे, पुरुषांवरील मानसिक त्रासामुळे हतबल झाल्याचे दिसत असून आता त्या पुरुषांच्या हक्कासाठी पुढे सरसावल्या आहेत.
सध्या राज्यातील महिला अनेक कर्तृत्वाची कामे करीत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलाच विराजमान व्हाव्यात अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात भाजपचे 5 वर्ष सरकार राहणार असून जर मुख्यमंत्री बदलाची वेळ आल्यास भाजपने महिलांना संधी द्यावी असेही त्यांनी म्हटले. याबाबत पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रस्थानी असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुनही तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, आरोपी वाल्मिक कराड व पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.
राज्य गुन्हेगारीमुक्त व्हावे –
दरम्यान, सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून वाढलेली गुन्हेगारी, संतोष देशमुख यांच्यासारखी प्रकरणे पाहता महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करावे आणि यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी असे साकडे आपण आज विठ्ठलाला घातल्याचे तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 03-04-2025
