BJP Nitin Gadkari: “राजा म्हणून शिवाजी महाराजांनी खूप मोठं कार्य केलं. महाराजांनी जेव्हा अफझल खानाचा वध केला तेव्हा त्यांनी आदेश दिला की, सन्मानाने त्याची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर तयार करा.
सध्याच्या काळात सेक्युलर हा खूप चर्चेत असणारा शब्द आहे. पण इंग्रजीत सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नसून सर्वधर्मसमभाव असा आहे. सर्व धर्मांच्या बाबतीत समान न्याय करणं, हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाच्या इतिहासातील असे लोककल्याणकारी राजा होते जे १०० टक्के सेक्युलर होते,” असं मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित इंग्रजी पुस्तकाच्या नागपूर इथं आयोजित प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र इंग्रजी भाषेत येत आहे याचा मला आनंद आहे. कारण शिवरायांविषयी, त्यांचा इतिहास आणि कार्यकर्तृत्वाविषयी महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच लोकांच्या मनात अनेक गैरसमज होते. लहानपणी आमच्या हृदयात आमच्या आई-वडिलांपेक्षाही शिवाजी महाराजांचं स्थान मोठं होतं. ते आमचे आदर्श आहेत कारण ते आदर्श राज्यकर्ते होतेच, पण त्यासोबतच आदर्श वडीलही होते. न्याय देणारे राजे होते आणि कल्याणकारी राजेही होते. ‘यशवंत, कीर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा,’ असं शिवरायांचं खूप छान वर्णन रामदास स्वामींनी केलं आहे. प्रत्येक गोष्टीत कोणी आदर्श राजा असेल तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे,” अशा भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.
शिवरायांच्या इतिहासाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला आहे. “शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, पण कधी कोणत्या मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण येत असत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दरबारात हजर केलं असता महाराजांनी तिला सन्मानाने घरी पाठवण्याचं काम केलं. महिलांप्रती आदर, जनतेच्या प्रती संवेदनशील आणि वेळ आल्यावर आपल्या जवळच्या लोकांनाही शिक्षा करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. सध्याच्या काळात प्रत्येक राजकारणी आपल्या मुलासाठी, मुलीसाठी, पत्नीसाठी निवडणुकीत उमेदवारी मागत असतो,” असं ते म्हणाले.
दरम्यान, “राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले होते त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न होते. मात्र इंग्रजांच्या शासनकाळात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जो इतिहास लिहिला गेला, या इतिहासातील अनेक बाबी अशा होत्या ज्या शिवाजी महाराजांवर अन्याय करणाऱ्या होत्या,” अशी भूमिकाही नितीन गडकरी यांनी मांडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 03-04-2025
