रत्नागिरी : निवळी गावात घरफोडी; अज्ञात चोरट्याने ११,१०० रुपयांचा ऐवज केला लंपास

रत्नागिरी, दि. ०४ एप्रिल २०२५: रत्नागिरी तालुक्यातील निवळी, गावडेवाडी येथे एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ११,१०० रुपयांचा माल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी रात्री २१.०० वाजेपासून ते दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. याप्रकरणी रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

फिर्यादी मैथिली योगेश गावडे (वय २३ वर्षे, रा. घर नं. १९७, निवळी, गावडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ११,१०० रुपये असून, त्यात ५,५०० रुपयांची रोख रक्कम आणि ५,६०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने समाविष्ट आहेत. हे दागिने सन २००० पूर्वी बनवलेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची नोंद दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी रात्री २०.३१ वाजता रत्नागिरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा क्रमांक ६०/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१ (३) (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

निवळी, गावडेवाडी परिसरात घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास सुरू केला असून, परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. अज्ञात चोरट्याचा सुगावा लागावा यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना घराच्या खिडक्या-दरवाजे सुरक्षित ठेवण्याचा आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 04-04-2025