दापोली पोलिस स्थानकात मुलाकडून आईला मारहाण

दापोली : दापोली पोलिस ठाण्यात चौकशीच्या कामाला आलेल्या आईला तिच्या मुलानेच पोलिस ठाण्यात शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी मुलाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव लष्करवाडी येथील सुरेखा गजानन कणकेकर (७०) व त्याचा मुलगा विनायक गजानन कणकेकर (३४) हे दापोली पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता चौकशीकामी आले होते. ते काम सुरू असतानाच पोलिस ठाण्यातच विनायक याने जमिनीच्या कारणावरून त्याची आई सुरेखा हिला शिवीगाळ करून खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण केली. या मारहाणीत सुरेखा यांच्या डाव्या हाताचे मधले बोट मोडले असून, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरेखा कणकेकर यांनी मुलाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 04/Apr/2025