रत्नागिरी : निवखोल येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील निवखोल येथे महावितरणच्या खांबावरील तुटलेली वायर जोडत असताना विजेचा जोराचा धक्का बसून तरुण कंत्राटी मदतनीस कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कुंदन दिनेश शिंदे (21, रा. फणसवळे भावेवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी, कुंदन हा निवखोल येथील महावितरणच्या खांबावरील तुटलेली वायर जोडत होता. खांबावर चढण्यापूर्वी तेथील विद्युतपुरवठा बंद केला होता. परंतु, पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना तेथील जनरेटचा करंट बॅक आल्याने त्याचा जोरदार धक्का बसून कुंदनचा जागीच मृत्यू झाला. ही बाब त्याच्या इतर सहकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कुंदनला तपासून मृत घोषित केले.

मदतनीस कामगारांकडे सेफ्टी गार्ड नाही
मदतनीस म्हणून कामाला असणार्‍या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास 300च्या आसपास आहे. या कामगारांना ठेकेदाराकडून कोणतेही सेफ्टी गार्ड पुरवण्यात येत नाहीत. तसेच महावितरणच्या पोलवर प्रशिक्षित लाईनमनने दुरुस्तीची कामे करण्याचा नियम असताना मदतीस कामगारांना तुटपुंज्या पगारावर पोलवर चढवून त्यांच्याकडून कामे करवून घेण्यात येत असल्याची चर्चा शासकिय रुग्णालयात या मदतनीस कामगारांकडून सुरु होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 08/Oct/2024