मंडणगड : नारगोली येथे पावसाळ्यात भूस्खलनाची शक्यता; संरक्षक भिंत उभारणीची मागणी

मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार नारगोली येथील भूस्खलनाची शक्यता निर्माण झालेल्या ठिकाणी महसूल विभागाने पाहणी केली. येथे तत्काळ संरक्षक भिंत उभारणीची आवश्यकता व्यक्त करत तशा सूचना संबंधीत विभागास देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे यांनी दिली आहे.

मंडणगड-पालवणी दापोली राज्य महामार्गावर नारगोली या ठिकाणी रस्त्यालगत दरड खाली येऊन येथील घरे प्रभावीत होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी संरक्षक भिंतीची मागणी केली होती. पावसात भूस्खलन झाल्यास घरांना धोका निर्माण होऊन राज्य महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटू शकतो.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड. राकेश साळुंखे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या कानावर ही समस्या घातली. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी महसूल विभागास या समस्येसंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ११ एप्रिल रोजी तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या सूचनेनंतर महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात ग्रामस्थ शंकर पांढरे, अजित पांढरे, कोथेरे, तलाठी संजय गावकर व राकेश साळुंखे उपस्थित होते.

यावेळी पंच यादी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना पावसाळ्यातील धोक्याची माहिती दिली. महसूल विभागाने येथे सरंक्षक भितींची गरज असल्याची बाब संबंधीत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने बांधकाम विभाग नेमकी कोणती कार्यवाही करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 15/Apr/2025