सांगली : सामान्य माणूस जोवर आपली भाषा – चलनात ठेवतो, तोवरच ती टिकते. मराठी भाषेचं चलन सुरू ठेवणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे, असे मनोगत ९८ व्या अखिल व भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जी निवड झालेल्या लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. निवडीनंतर व त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. भवाळकर यांच्या निवडीने सांगली नगरीच्या साहित्य परंपरेत मानाचा तुरा खोवला गेला. विचार, मते आणि भूमिका ठामपणे मांडणाऱ्या डॉ. भवाळकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही, हा सन्मान लोकसाहित्य परंपरेचा आणि त्यातील साऱ्या लोककलावंतांचा असल्याची भावना व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे ठीक, त्याचं समाधानही आहे. पण समाजात पहिल्यापासूनच उच्चभ्रूच्या भाषेचा सन्मान केला जातो आणि सामान्यांची भाषा डावलली जाते. पूर्वी संस्कृतला मोठेपणा होता आणि आता इंग्रजीला आहे. सामान्यांची भाषा जी प्राकृत होती, ती डावलली गेली होती; तशी आता मराठीची स्थिती आहे. मराठी शाळा आणि ग्रंथालयांची अवस्था वाईटच आहे. आपण इंग्रजी सर्वश्रेष्ठ म्हणतो, पण आपल्या भाषेला दुय्यम का मानायचं? आपणाला आपल्या भाषेची अस्मिता असलीच पाहिजे.
लोकसंस्कृतीचा प्रवाह
लोकसंस्कृती टिकवायची म्हणून ती टिकत नाही आणि टिकवता येत नाही. कारण तो लोकसमूहाचा आविष्कार असतो. लोकसंस्कृती हा प्रवाह आहे. तो अखंड चालतच राहतो. संस्कृतीच्या प्रवाहात काही नवीन गोष्टी तयार होतात. काही राजकारणी लोक बदलायचा प्रयत्न करतात. जुन्या गोष्टी गळून पडतात, तर अनेक गोष्टींची रूपं बदलतात. पण प्रवाह नेहमी ताजा असतो. तो शिळा होत नाही. या प्रवाहातील चांगल्या गोष्टी घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तशी नजर आपल्याला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अडाणी आणि निरक्षर यात फरक
त्या म्हणाल्या, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतून मला सर्वसामान्य माणसाचं जीवन सापडलं. माणसाचा सारा प्रवास लोकसंस्कृतीत येतो. ही संस्कृती मूळ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोकसाहित्याला अडाणी लोकांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणतात. मी हा शिक्का पुसून टाकला, असं मला वाटतं. त्यासाठी राजवाडे यांच्यापासून ढेरेंपर्यंत साऱ्यांचं मार्गदर्शन मिळालं. निरक्षर आणि अडाणी यात फरक आहे. साक्षर होण्याची संधी या लोकांना खूप कमी दिली गेली. उच्चवर्णीय आणि स्त्रिया साक्षर होत्याच असंही नाही. शिक्षण असणं आणि शहाणपण असणं यातही खूप अंतर आहे. आदीम ते आजपर्यंतचा माणसाचा प्रवास लोककलांतून दिसतो. त्याचा शोध घेण्यातला आनंद हाच माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.
सांगलीचे उपकार
५५ वर्षे मी सांगलीत आहे. सांगलीचे फार मोठे उपकार आहेत. सांगली ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सीमेवर आहे. सांगलीमुळंच मला या साऱ्या सीमांपलीकडं बघता आलं. कर्नाटकी, गोवा, दशावतार, तामिळनाडू नाटकांचा अभ्यास करता आला, तो सांगलीमुळंच, अशी भावना डॉ. भवाळकर त्यांनी व्यक्त केली.
हा लोकसाहित्याचा सन्मान
हा सन्मान केवळ माझा नाही, तर ज्या अभ्यास क्षेत्रात मी काम करते आहे, नाटक- लोकसंस्कृती आणि स्त्रीसाहित्यात कार्य करते आहे, त्या विचारांचा आणि साहित्याचा हा सन्मान आहे. माझ्या अगोदर यासाठी काम करणाऱ्या आणि त्यानंतर काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. कारण लोकसंस्कृतीचा हा प्रवास माणसाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सलग सुरू आहे. त्या भाषा चाली-रिती-रूढी यांचा आविष्कार या सगळ्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी जन्मभर करत आले. त्यातून आनंद मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 08/Oct/2024