मंडणगड : तालुक्यातील तुळशी येथील ग्रामदेवता भैरवनाथांचा वार्षिक ग्रामोत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात झाला. या निमित्ताने तुळशी ग्रामस्थ वरचा विभाग यांच्या वतीने जननी देवी कलापथक कुडुक खुर्द हनुमानवाडी विरुद्ध नवतरुण तमाशा मंडळ पालेकोंडे अशा शक्तितुरा डबलबारी प्रश्नोत्तरी तमाशा सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुडुक खुर्द तमाशा मंडळाने प्रश्नाचे अचूक उत्तर देता सन्मान पटकावला.
हनुमान जयंतीनिमित्त तुळशी चैत्रीचा जत्रोत्सव उत्साहात झाला. दिवसभर ग्रामदेवतेची पालखी गावातून फिरवली गेली तसेच शरण काढून पालखी नाचवण्यात आली, पंरपरेनुसार रात्री शक्तितुरा या लोककलेचे डबलबारी प्रश्नोत्तरी सामने आयोजित करण्यात आले होते. दोन्ही तमाशा मंडळांना पंधरा दिवस आधी एकमेकांचा प्रश्न देण्यात आला होता. या सामन्यासाठी पंचा म्हणून सुहास
रांगले, अभय पिचुर्ले, संजय घागरूम यांनी काम पाहिले. समय निरीक्षक म्हणून अनंत केंद्रे व अनंत पारधी यांनी काम पाहिले. गण, गौळण, पद, टोणपा असा शास्त्र पुराण यांचा संदर्भ घेऊन शिवशक्ती श्रेष्ठत्वाचा वाद तमाशाच्या माध्यमातून रंगला. पहाटे पंचांनी निकालाचे वाचन करून कुडुक खुर्द तमाशा मंडळाचे उत्तर अचूक असल्याचे जाहीर केले.
पालेकोंडचे उत्तर हे अपेक्षित उत्तराशी जुळले नाही. यानंतर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दोन्ही तमाशा मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विजेत्यास विजयी सन्मानचिन्ह देण्यात आले. या निमित्ताने आयोजित जाहीर सत्कार व स्वागत समारंभाला गृह राज्यमंत्री योगेश कदम, संतोष पोस्टुरे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, संजय शेडगे, गुणाजी रांगले आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 16/Apr/2025
