एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला 44 टक्के पगार खात्यावर जमा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून त्यांचे थकीत 44 टक्के वेतन खात्यावर जमा करण्यात आले आहे. या आधी मार्च महिन्याचे केवळ 56 टक्के वेतन देण्यात आले होते.

त्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांनीही राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आता राज्य सरकारकडून उर्वरित वेतन एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.

या आधी एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्केच वेतन दिल्यानंतर महामंडळ आणि राज्य सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली होती. आमच्या फाईल्स या अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाहीत, त्या परस्पर परत पाठवल्या जातात असं सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होण्यासाठी आपण 5 तारखेलाच अर्थमंत्रालयात ठाण मांडू असंही ते म्हणाले होते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम इतर कोणत्याही ठिकाणी वापरण्यात येऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही सरनाईक म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषानंतर राज्य सरकारच्या वतीने हालचाली सुरू झाल्या. एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित वेतन हे 15 एप्रिल पर्यंत दिलं जाईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता उर्वरित 44 टक्के वेतन हे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 16-04-2025