रत्नागिरी : येथील कॅरम क्वीन आकांक्षा उदय कदम हिला राज्य शासनाचा २०२३ – २४ चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. येथील शिर्के हायस्कूलची ती माजी विद्यार्थिनी आहे. १२ वेळा तिने कॅरममध्ये राज्य विजेतेपद पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य पातळीवर तिने आतापर्यंत ३० सुवर्णपदके, दहा रौप्य, तर ११ कांस्यपदके मिळविली आहेत.
सध्या मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाला मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महेश देवरुखकर, यश कदम, राज्य कॅरम असोसिएशनचे यतीन ठाकूर, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार यांच्यासह शिर्के हायस्कूलचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भटकर, सचिव मिलिंद साप्ते व जिल्हा कॅरम पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
१८ एप्रिलला पुरस्काराचे वितरण पुणे, बालेवाडी येथे होणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकांक्षा कदम म्हणाली, “साखरपा येथील शाळेत कॅरम खेळण्यास सुरुवात केली. शिर्के प्रशालेत आठवीला प्रवेश घेतला. आई-वडील, प्रशिक्षक यांच्या पाठबळामुळे शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालता आली. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, ते पूर्ण करता आले.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 16-04-2025
