कोयना अवजल मुंबईला नेण्याचे हवाई सर्वेक्षण पूर्ण

रत्नागिरी : कोयना धरणातून बाहेर पडणारे ६८ टीएमसी पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवून उर्वरित पाणी मुंबईत वळविण्यासाठी आवश्यक हवाई सर्वेक्षण हेलिकॉप्टरद्वारे नुकतेच पूर्ण झाले आहे. तब्बल ३८ कोटी रुपये या सर्वेक्षणासाठी खर्च आला असून व्हॅसकॉम कंपनीने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. याचा अहवाल राज्य सरकारला कंपनी लवकरच देणार आहे. कोयनेचे अवजल १६० कि.मी.च्या पाईपलाईनद्वारे मुंबईला वळविले जाणार आहे.

वीजनिर्मितीनंतर कोयना धरणातील सुमारे ६८ टीएमसी पाणी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाते. बाहुन जाणारे हे पाणी सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या मुंबईत जलवाहिन्यांमधून आणण्याचा प्रस्ताव आहे. हे पाणी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ शहराला देण्याचे राज्य सरकाराच्या विचाराधीन आहे.

पाणी मुंबईपर्यंत आणायचे झाल्यास मुंबईतून कोकणापर्यंत जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गाप्रमाणे पाईपलाईन टाकल्यास पाईपलाईन टाकण्यासाठीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण करुन पाईपलाईन जंगलातून नेण्याचा विचार सरकार करत आहे.

राज्य सरकारने नेमलेल्या समितीने मात्र सकारात्मक पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पाटबंधारे विभागाचे माजी सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली कोयना अवजल पाणी अभ्यासगट नेमला होता. त्याचा अहवाल समितीने २००५-०६मध्ये सरकारला दिला, सरकारने या अहवालातील शिफारशी तत्त्वतः स्वीकारल्या होत्या.

म. दि. पेंडसे समितीने या अहवालात कोयनेच्या पाण्याचा वापर आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी करावा. शेतीसाठी पाणी दिल्यानंतर उरलेले पाणी मुंबईला द्यावे, अशी शिफारस सरकारला केली होती, त्यानुसार कोयना धरणातून बाहेर पडणाऱ्या ६८ टीएमसी पाण्यापैकी १८ टीएमसी पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात येणार आहे. तर उर्वरित ५० टीएमसी पाणी पाईपलाईनद्वारे मुंबईला वळविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कंपनी आपला आहवाल तयार करणार आहे.

कोयना अवजल मुंबईला नेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाला तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कंपनीला सर्व्हेक्षण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. कंपनीने दिलेल्या मुदतीपूर्वी आपले सव्र्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे कोयना अवजलाबाबतचा निर्णय लवकरच राज्य शासन घेण्याची शक्यता पाटबंधारे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 24/Apr/2025