खेड : मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झालेल्या खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट परिसरात अंडरपास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षक भिंतींवर कोकणचे दर्शन घडविणारी निसर्गचित्र रेखाटण्यात आली आहेत. मात्र, रस्त्याकडेला जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आगीच्या ज्वाळांनी ही चित्रे काळवंडली आहेत. काही ठिकाणी तर चित्रावरच जाहिराती चिकटविण्यात आल्याने चित्रांचे विद्रुपीकरण झाले आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी आधी, तर काही ठिकाणी मार्ग पूर्ण झाल्यावर अंडरपास मार्ग उभारण्याचे काम ठेकेदार व बांधकाम विभागाकडून केले जात आहे. लोटे-घाणेखुंट अंडरपास मार्गावरील संरक्षक भिंती दोन्ही बाजूंनी कोकणातील पारंपरिक चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाळ्यानंतर रंगविलेल्या भिंती काहीच दिवसात कचरा जाळल्याने धुरात काळवंडल्या आहेत.
दोन्ही बाजूकडील व्यापारी आपल्या दुकानातील कचरा या भिंतीशेजारी जाळत असल्यामुळे निसर्गचित्र काळ्या धुरात हरविले आहे, तर या चित्रावर काही ठिकाणी जाहिरातीही चिकटविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनी याठिकाणच्या व्यापाऱ्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी किंवा कचरा संकलन करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. ही चित्रे महामार्गाची आणि पर्यायाने जिल्ह्याची शोभा वाढवणारी असल्याने अशा पद्धतीने तेथे कचरा जाळणाऱ्यांबाबत ग्रामपंचायतीने प्रसंगी कारवाईच धोरण स्वीकारावे, अशी अपेक्षा केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 16/Apr/2025
