दापोली : मच्छीमार सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी नीलकंठ रघुवीर यांचे नाव सूचवल्याने त्याचा राग येवून वाडीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला तसेच अन्य कुटुंबांना २०१५-१६ पासून वाळीत टाकले असल्याची तक्रार पाजपंढरी येथील गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारीत गणेश चोगले, महेश तबीब, विष्णू तबीब, ब्रम्हानंद कुरुळकर, अनिल चोगले, बाळकृष्ण रघुवीर (पाजपंढरी-शेतवाडी) अशी संशयितांची नावे असून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पाजपंढरी शेतवाडी येथील गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी २०१५-२०१६ मध्ये श्रीराम मच्छीमार सहकारी संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी नीलकंठ रघुवीर यांचे नाव सूचवले होते. त्यानुसार रघुवीर यांची नियुक्तीही झाली होती. त्यानंतर झालेल्या वाडीच्या बैठकीत गणेश चोगले व अन्य ग्रामस्थांनी याला आक्षेप घेत ‘तू ज्या संस्थेवर संचालक आहेस, त्या पदाचा राजीनामा दे’ असे गोपीचंद चोगले यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. मात्र संस्थेच्या संचालक मंडळाने तो स्वीकारला नसल्याने ते कार्यरत राहिले. त्यानंतर ८ एप्रिल रोजी रात्री झालेल्या बैठकीत पुन्हा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच पाजपंढरी येथे रामनवमी पालखी मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आल्याची तक्रार गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 16/Apr/2025
