चिपळूण : आर्थिक परिस्थितीमुळे अनेक दिव्यांग विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. उच्चशिक्षित नसल्याने त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून धडपड करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सॅडविक कोरोमंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बळ दिले आहे. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान व सॅडविक कोरोमंट इंडिया यांच्या वतीने उडान शिष्यवृत्तीअंतर्गत जिल्ह्यातील पाच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाखाची शिष्यवृत्ती दिली.
उडाण शिष्यवृत्तीत शिक्षणशुल्क, जेवण आणि राहण्याचा खर्च (वसतिगृह शुल्क), आवश्यक शैक्षणिक उपकरणे, शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन पाचा खर्च देण्यात आला आहे. या योजनेसाठी जून २०२४ मध्ये इच्छुक दिव्यांगांचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर अर्जाची पडताळणी करून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. गृहभेटीनंतर अर्जाची छाननी झाली. त्यामधून पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांची घरची परिस्थती पाहून शिष्यवृत्तीसाठी निवड केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लोटे येथील कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांमध्ये देवेश कुळपे, वेदांत शिताप आणि सोहम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कंपनीचे प्रमुख प्रल्हाद जाधव म्हणाले, आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणीनी धैर्याने तोड देण्यासाठी सॅडविक कोरोमंट इंडिया आणि ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान कायम सोबत राहील तसेच प्रशांत सुडे यांनी आर्थिक साहाय्य, क्षमता बांधणी विकास आणि वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन केले.
उडाण शिष्यवृत्तीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी बळ मिळाले आहे. हे विद्यार्थी आत्मविश्वासाने नवनवीन क्षितिजे गाठतील आणि कष्टाने स्वावलंबी बनतील. – राजू ठसाळे, सरपंच, घाणेखुंट
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 09/Oct/2024