मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: रत्नागिरी जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक आज होणार अयोध्येला रवाना

रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ ८०० नागरिकांना मिळाला असून, आज (ता. २६) ही रेल्वे अयोध्याकडे रवाना होणार आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सकाळी १० ऐवजी दुपारी १२.१५ वाजता होणार असून, या वेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. खेड रेल्वेस्थानकावर दुपारी २.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहतील, असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्वधर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनयात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले होते. त्याला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठीची ही पहिली रेल्वे अयोध्येला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून दुपारी एक वाजता रेल्वे अयोध्येकडे रवाना होणार आहे. या रेल्वेचा दुसरा थांबा खेड रेल्वेस्थानकावर असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 26-04-2025