मराठी शाळा बंद होऊ देणार नाही : दत्ता कदम

लांजा : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, शासनाचा मराठी शाळा बंद करण्याचा घाट यशस्वी होऊ देणार नाही. सर्व संस्था चालकांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठामपणे उभी राहील. वेळ पडल्यास जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, पालक व विद्यार्थी यांच्यासोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी दिला आहे.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता निर्गमित केली आहे. मात्र, या संचमान्यतेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यातील हजारो शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे भविष्यात या शाळा बंद पडण्याची भीती आहे. नवीन शासन निर्णयानुसार पटसंख्येची अट कायम ठेवली असून प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थी असल्यास शिक्षक कायम राहील. मात्र रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ व दुर्गम भागात आहे. या डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात असलेल्या शाळांमध्ये गोरगरीब, बहुजन समाजातील मुले माध्यमिक शिक्षण घेत आहेत.

नवीन निर्णयानुसार नववी, दहावीला किमान ४० विद्यार्थी नसल्यास एकही शिक्षक मंजूर होत नाही. शासनाच्या या जाचक निर्णयामुळे जिल्ह्यातील ६८ शाळांमध्ये नववी व दहावीच्या वर्गासाठी एकही शिक्षक मिळणार नाही अशी स्थिती आहे. हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास वर्गनिहाय शिक्षक अशी पदे मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 28/Apr/2025