दापोलीत तीन भारतरत्नांचे संयुक्तिक स्मारक उभारू : खासदार सुनील तटकरे

दापोली : “महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास हा नवीन पिढीला समजावा आणि महाराष्ट्राने देशासाठी किती योगदान दिले आहे, हे समजून त्यातून प्रेरणा घेऊन पुढील पिढीनेही देशासाठी योगदान द्यावे, यासाठी १ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगल कलशपूजन कार्यक्रम मुंबईत आयोजित केला आहे. याप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्र्यांपुढे दापोलीमध्ये तीन भारतरत्नांचे संयुक्तिक स्मारक उभारणीचा प्रस्ताव मांडू,” असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

दापोलीतील फाटक कॅपिटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तटकरे म्हणाले, “२०१४ मध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणुकीला उभा राहिलो, त्यावेळी दापोलीतील पत्रकार मित्रांनी ही भूमी तीन भारतरत्नांची असून, त्यांचे संयुक्तिक स्मारक दापोलीमध्ये उभारावे, अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा केला आहे.

१ मे रोजी राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित मंगल कलशपूजन सोहळ्याला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करू. दापोलीच्या भूमीने राज्याला, पर्यायाने देशाला अनेक रत्ने दिली असून, या रत्नांचा अभिमान हा प्रत्येक दापोलीकरांना असायला हवा.” यावेळी हर्णे येथील अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांनी नईम हुनेरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 30/Apr/2025