लांजा : ‘डीपी प्लॅन’ रद्द होईपर्यंत एकमुखी लढा; बैठकीत निर्धार

लांजा : लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा डीपी प्लॅन जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण गावच्या वतीने या विरोधात एकमुखी लढा देण्याचा ठाम निर्धार लांजा चव्हाटा मंदिर येथे पार पडलेल्या लांजावासीयांच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत तसेच या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची देखील भेट घेऊन डीपी प्लॅन रद्द करण्यासाठी त्यांना निवेदन सादर करण्याचे देखील या बैठकीत ठरविण्यात आले.

लांजा नगरपंचायतीच्यावतीने जाहीर करण्यात आलेला शहरविकास आराखडामुळे लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्यावस्तीतील अनेक घरे बाधित होणार आहेत, लोकांच्या शेतजमिनी, घरे यांच्यासह अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, तर हा प्लॅन कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, असे आमदार किरण सामंत त्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत जाहीर केले होते.

या पार्श्वभूमीवर लांजा गाव कमिटीच्यावतीने आयोजित बैठक सोमवारी सायंकाळी श्रीदेव चव्हाटा मंदिर या ठिकाणी पार पडली. या बैठकीला गावातील विविध वाड्यांमधील नागरिक उपस्थित होते. गाव कमिटीच्यावतीने प्रकाश लांजेकर यांनी सांगितले, हा डीपी प्लॅन लांजावासीयांना उद्ध्वस्त करणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेवून केवळ लांजा गावच्या हितासाठी एकत्र या आणि हा डीपी प्लॅन रद्द करण्यासाठी प्रयत्न करूया, कोणत्याही परिस्थितीत हा प्लॅन रद्द झालाच पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रपणे लढा देऊया.

हा अन्याय कशासाठी ?
कणकवली व अन्य ठिकाणांचे डीपी प्लॅन रद्द झालेले आहेत. मग, लांजावरच हा अन्याय कशासाठी? मोठे रस्ते तयार करून कोणता विकास साधला जाणार आहे? त्यामुळे लोकांना देशोधडीला लावणारा हा डीपी प्लॅन आम्हाला नकोच. तो रद्दच झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 30/Apr/2025