रत्नागिरी : थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेसंबधी ‘जैसे थे’चे उच्च न्यायालयाचे आदेश

रत्नागिरी : थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या जागेवर ‘जैसे थे’चे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. थिबा राजाकालीन बुद्धविहारच्या जागेसंदर्भात मोठा वाद निर्माण झाल्यानंतर सोमवारी (ता. २८) मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. रत्नागिरीतील थिबा राजाकालीन बुद्धविहारच्या जागेवर होणाऱ्या कम्युनिटी सेंटरविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि एम. सेठना यांनी हे आदेश दिले.

उत्तरदाराने १२ जून २०२५ पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत संबंधित भूखंडावर ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत रत्नदीप काशिनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र राज्यशासन व अन्य विरोधकांविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अॅड. मोहित दळवी यांनी युक्वातिद केला. न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांना सार्वजनिक हिताशी संबंधित मानत यास जनहित याचिका म्हणून रूपांतर करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणातील उत्तरदार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र १२ जून २०२५ पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत संबंधित भूखंडावर ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचे आदेश सर्व उत्तरदारांना देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांनी याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करण्यासाठी योग्य पावले तातडीने उचलावीत, असेही निर्देश दिले. हा आदेश भीम युवा पँथर व सर्व आंबेडकरी समाजासाठी एक मोठा विजय मानला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 30/Apr/2025