रत्नागिरी : राजा शिवछत्रपती परिवाराच्या रत्नागिरी विभागातर्फे घेरा यशवंतगड किल्ल्यावर स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली होती. त्याची स्वच्छता करण्यात आली. गेली दोन वर्षे हा उपक्रम सुरू असून आता हळुहळू बुरूजांनी मोकळा श्वास घेतला आहे.
किल्ला झाड, वेलींनी झाकून गेला होता. या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने राजा शिवछत्रपती परिवार, शिवसंघर्ष संघटना (नाटे) आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, दुर्गवीर संस्था, जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ (माजरेकरवाडी, जैतापूर) आणि परिसरातील दुर्गप्रमी शिवप्रेमींनी मागील काही वर्षांपासून गडाच्या थोड्या थोड्या भागातील झाडी तोडून गड मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या मोहिमेत गडपूजन करून प्रेरणामंत्र आणि ध्येय मंत्र म्हटला, बालेकिल्ल्याची पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील बाहेरील तटबंदी आणि संरक्षक खंदकाची, गडावर येणाऱ्या मुख्य मार्ग, परकोट महाद्वाराबाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आली. परकोटातील पायरी मार्ग मोकळा करण्यात आला. बालेकिल्ल्यालगत असणारी परकोटाची तटबंदी, परकोटाचा पश्चिमेकडील टेहळणी बुरूज, बालेकिल्ल्याचा आतील परिसर स्वच्छ करण्यात आला.
लवकरच नवा साज
पुरातत्त्व विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे काम मागील वर्षापासून सुरू झाले आहे. त्यातून, बालेकिल्ल्याची ढासळलेली तटबंदी, बुरूजांची डागडुजी करण्यात येत आहे. मुख्य दरवाजापासून आतील परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे. सुशोभीकरणानंतर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले यशवंतगडाला नवा साज चढणार आहे.
पाच वर्षे संस्था कार्यरत
राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी २०२० पासून या किल्ल्यावर संवर्धनाचे काम करत आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवार, ३२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून महिन्यातील एक रविवार प्रत्येक गडकिल्ल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 30/Apr/2025














