राजापुरातील संभाव्य पूरपरिस्थितीवर आज चर्चा

राजापुर : अर्जुना कोदवली नद्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे राजापूर शहराला फटका बसतो. या स्थितीमध्ये यावर्षीही फारसा बदल होण्याची शक्यता नाही. संभाव्य पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी २ मे रोजी शहरातील पूररेषेतील नागरिक, व्यापारी यांच्याशी प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.

राजापूर शहारातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नदीपात्रात गाळ साचलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात वारंवार या नद्यांना पूर येतो. राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. सतत निर्माण होणाऱ्या पूरस्थितीने शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने निश्चित केलेली पूररेषा शहर विकासात्त अडथळा ठरत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा नदीपात्रांमध्ये साचलेल्या गाळाचा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये लोकसहभाग आणि शासन निधीतून उपसा सुरू आहे.

गाळ उपशानंतरही पूरस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. तरीही पुराच्या तीव्रतेमध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पूरस्थिती आणि संभाव्य आपत्ती लक्षात घेता त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुररेषेतील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांशी मॉन्सूनची पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून संवाद साधण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये संभाव्य आपत्ती, पूरस्थिती आणि उपाययोजना यादृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होईल. या बैठकीच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देणाऱ्या नोटिशीही बजावल्या आहेत.

प्रशासन दक्ष
अर्जुना-कोदवली नद्यांच्या पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्याआधी दोन महिने प्रशासनाने घेतलेल्या बैठकीबदल राजापूरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या बैठकीनंतर उपाययोजनेकडेही प्रशासनाने तितक्याच गांभीयनि लक्ष द्यावे, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 02/May/2025