काळबादेवीत फ्लायओव्हर ब्रिजसाठी सर्वेक्षण पूर्ण, पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात

रत्नागिरी, 06 मे 2025 : रत्नागिरी तालुक्यातील रेवस रेड्डी सागरी महामार्गावर काळबादेवी येथे प्रस्तावित फ्लायओव्हर ब्रिज उभारणीला गती मिळाली आहे. ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सर्वेक्षण पूर्ण केले असून, पावसाळ्यानंतर या पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

19 एप्रिल 2025 रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काळबादेवी येथे ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सागरी महामार्गाच्या नवीन अलायनमेंटची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कागदावरील नकाशे दाखवून ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांची घरे जाणार नाहीत, असा पर्याय मांडला. बैठकीनंतर अवघ्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण झाले. काळबादेवी खाडीकिनाऱ्यापासून रामेश्वर मंदिर, भोवारी मार्गे चार किलोमीटर लांबीचा हा पूल उभारला जाणार आहे. सर्वेक्षणासाठी चार दिवस लागले असून, आता अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे निधीची मागणी केली जाईल.

मात्र, सर्वेक्षणानंतर काही ग्रामस्थांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मते, या पुलामुळे पर्यटनदृष्ट्या स्थानिकांना फायदा होणार नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे आश्वासन दिले आहे. हा पूल सागरी महामार्गावरील वाहतूक सुलभ करेल आणि परिसराच्या विकासाला चालना देईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. पुढील टप्प्यातील कार्यवाही पावसाळ्यानंतर सुरू होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 06/May/2025