Breaking : पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरीसह महाराष्ट्रात उद्या युद्धाची मॉकड्रील

रत्नागिरी, 06 मे 2025: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. युद्धाची शक्यता लक्षात घेता, केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना 7 मे रोजी मॉकड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील 16 ठिकाणी उद्या ही मॉकड्रील होणार असून, नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

या मॉकड्रीलमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जाणार आहेत. नागरिकांना ब्लॅकआऊट कसे करावे, सुरक्षित ठिकाणी कसे जावे, आणि इमारतींखाली कसे जमा व्हावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्र सरकार हायअलर्टवर असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनाशी संपर्कात राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

मॉकड्रीलची ठिकाणे: मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 16 ठिकाणी मॉकड्रील होणार आहे.

1971 मध्येही भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा मॉकड्रील्स घेण्यात आल्या होत्या. तेव्हा सायरन वाजवून ब्लॅकआऊटचा सराव केला जात होता. ताजमहाल काळ्या कपड्याने झाकले गेले होते, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तेव्हा लष्कर आणि जिल्हा प्रशासनाने गावोगावी मॉकड्रील्स घेऊन जनजागृती केली होती.

मॉकड्रीलदरम्यान सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी प्रथम घरातील सर्व लाईट्स बंद करावी, जेणेकरून शत्रूच्या विमानांना लक्ष्य दिसणार नाही. त्यानंतर इमारतीखाली पार्किंग एरियात जमा व्हावे, ज्यामुळे हल्ल्यादरम्यान सुरक्षितता वाढेल. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करावीत किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवावे. हवाई हल्ल्यात जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात कसे पोहोचवावे, याचाही सराव या मॉकड्रीलमध्ये होईल. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य कृती करता यावी, यासाठी मॉकड्रील महत्त्वाची आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 06/May/2025