रत्नागिरी : वृत्तपत्र प्रकाशकांना येत्या ३० जूनपर्यंत २०२४-२५ या वर्षाचे वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्रेस रजिस्ट्रार जनरल यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन अधिनियमातील तरतुदींनुसार मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या प्रकाशकांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
त्यानुसार निर्धारित मुदतीत विवरणपत्र न भरल्यास पहिल्या चुकीसाठी किमान १० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट केली जाईल. या अंतर्गत एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील व देशातील सर्व प्रकाशकांनी ३० जून २०२६ पूर्वी ते ऑनलाइन पद्धतीने प्रेस सेवा पोर्टलवर अपलोड करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंड आकारण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 25-06-2026














