चिपळूण : कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. दुसरीकडे सरकारमधील लोकप्रतिनिधी धनदांडग्या शैक्षणिक संस्थांचे कोकणात उद्घाटन करत आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होणार आहे. त्याकडे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. कोकणात ठाकरे सेनेकडून मराठी शाळा वाचवा अभियान सुरू केले जाणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, सामान्य घरातील मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवणे हे राज्यसरकारचे प्रथम कर्तव्य आहे; मात्र १५ मार्च २०२४ च्या शासननिर्णयानुसार कोकणातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरिबांची मुले प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होती. अशा अनुदानित शाळा राज्यसरकार बंद करणार आहे. शिक्षकांच्या पगारावर होणारा सरकारी खर्च कमी करण्यासाठी आणि खासगी इंग्रजी माध्यमच्या शाळांना वाव देण्यासाठी सरकारने नवीन धोरण आणले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते पालक मुलांना इंग्रजी माध्यमच्या शाळांमध्ये प्रवेश देतील, मात्र सामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील पालकमंत्री सजग आहेत.
त्यामुळे त्या ठिकाणच्या अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद केल्या जाणार नाहीत. केवळ मुंबई आणि कोकणातील अनुदानित शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या भागातील स्वतःला सक्षम समजणाऱ्या पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष आहे की, नाही असा प्रश्न पडतो. अनुदानित शाळा बंद केल्यानंतर त्या शाळेतील शिक्षक बेरोजगार होणार आहेत. डोंगरी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या सर्व सवलतीच्या योजना सरकारने बंद केल्या आहेत.
पण सवलती रद्द करू नका…
नव्या संचमान्यतेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ४२८ माध्यमिकची शाळा आणि ५५० प्राथमिकच्या शाळा बंद पडणार आहेत. त्यातून ९७८ शिक्षक अतिरिक्त होणार असून, यातील काहींचे समायोजन केले जाईल. उर्वरित शिक्षक बेरोजगार होणार आहेत. नव्या धोरणानुसार, २० पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार नाही मग त्या शाळेतील मुलांसाठी सरकारने पर्यायी व्यवस्था काय केली आहे. डोंगरी भागातील आमच्या मुलांना विशेष सवलत देऊ नका; पण आहे त्या सवलती रद्द करू नका, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 06/May/2025














