रत्नागिरीत १० ते १२ मेपर्यंत जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या वतीने दि. १० ते १२ मे रोजी जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या परिषदेच्या तयारीचा आढावा आज घेतला. रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात तिन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही परिषद होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूभगिनी तसेच प्रक्रिया धारक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार यांनी केले आहे.

परिषदेचे उद्घाटन दि. १० मे रोजी सकाळी १० वाजता कृषी मंत्री अँड. माणिकराव कोकाटे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैय्या) सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजना समिती अध्यक्ष दीपक केसरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमामध्ये आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींचे पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठा यांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रुचकर अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ विविध गट, कृषी व कृषी संलग्न विभागांची प्रशस्त दालने असणार आहेत. या दालनांमध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दालनांच्या नोंदणीसाठी रोहन चोथे (९८३४४८७१३८) व अमोल क्षीरसागर (८१८०८१३५६४) या क्रमांकावर संपर्क साधावा.

याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक विविध परिसंवाद, खरेदीदार-विक्रेता संमेलन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे. तसेच दि. १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्ये व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांसाठी प्रवेश ६० एवढ्आ मर्यादित प्रतिस्पर्धीना सहभागी होता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हर्षला पाटील (९४२२४४१५७१), गौरी शेरे (८८३०६४८०७७) यांच्याकडे नावे नोंदविण्यात यावीत, यासाठी प्रवेश निःशुल्क आहे. कृषी व कृषी संलग्न विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:05 PM 06/May/2025