रत्नागिरी : शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक

रत्नागिरी : शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करावे लागणार आहे.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून माहिती भरण्यासाठी महा स्कूल जीआयएस अॅप विकसित केले आहे. या अॅपवर माहिती भरावी लागणार आहे.

जिओ टॅगिंग करताना इंटरनेट नेटवर्क अनेकवेळा गायब झाल्याने फोटो अपलोड करताना मुख्याध्यापक, शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शौचालये, मैदान, किचन शेड, पाण्याची सोय व शाळेची इमारत आदी फोटो शासनाच्या अॅपवर अपलोड करण्यात आले. शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने फोटो अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत.

कागदोपत्रीच्या शाळांना लगाम
राज्यात काही ठिकाणी कागदोपत्री शाळा असल्याचे बोलले जाते. एकही विद्यार्थी, शाळेसाठी इमारत नसतानाही केवळ कागदोपत्री शाळा चालवल्या जात असल्याची चर्चा नेहमीच शिक्षण विभागात असते. या सगळ्या गोष्टींना आता आळा बसणार आहे. जिओ टॅगिंग केल्यामुळे शाळेचे ठिकाण नेमके कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारांना लगाम लागण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक बोगस शाळा
राज्यात अनेक बोगस शाळा आहेत. शिक्षक आणि भौतिक सुविधांची कमतरता असल्याने जीआयएस मॅपिंगवरून फोटो काढण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. राज्यातील सर्व शाळांनी जिओ टॅगिंगचा वापर करून माहिती भरल्यास राज्यातील शाळांची परिस्थिती कळणार आहे.

‘हे’ फोटो करावे लागणार
अपलोड शाळेचा नावासह फोटो, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलींचे आणि मुलांचे स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचे फोटो, मुख्याध्यापक शाळेच्या आवारात उभा राहून फोटो, असे सर्व फोटो महा स्कूल जीआयएस या अॅपवर अपलोड करावे लागणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 07/May/2025