जातीनिहाय जनगणनेची घोषणा म्हणजे राहुल गांधी यांच्या संघर्षाचा विजय – अनिरुद्ध कांबळे

लांजा : देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार केल्यामुळे केंद्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. हा देशातील जनतेच्या आणि राहुल गांधी यांच्या बांधिलकीचा विजय आहे, असे काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी व भीमशक्तीचे कोकण प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.

लांजा येथे पत्रकारांशी बोलताना कांबळे म्हणाले, “देशातील जनता अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा वारंवार मांडला. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यामुळे खऱ्या अर्थाने गांधी यांच्या संघर्षाला यश आले आहे. काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक वर्गाला योग्य हिस्सा देण्यासाठी कटिबद्ध आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी समाजातील वास्तव मांडले. जातनिहाय जनगणना म्हणजे भारताची पारदर्शकता आहे. त्यातून आपल्यामधील विषमता उघड होणार आहे. पन्नास टक्के आरक्षण मर्यादा हटवावी आणि खरी लोकसंख्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.”

जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असून, समान संधी, आत्मसन्मान आणि न्यायाच्या दिशेने वाटचाल करणारे मोठे पाऊल आहे. मात्र, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा निश्चित करावी आणि जातीनिहाय जनगणनेला मूर्त स्वरूप द्यावे. सरकारच्या जनगणनेतून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या लोकसंख्या प्रमाणानुसार न्याय मिळेल, तो दिवस भारतीय लोकशाहीचा विजय दिवस असेल, असे अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 07/May/2025